गुलाब आणि ती

हातात गुलाबांचा पुष्पगुच्छ घेवुन ती केव्हाची  उभी होती...वाट पाहून पाहून थकली होती कदाचित ..पण थकल्या नजरेनेही ती वाट पाहतच होती..मी दुरूनच तिच्या चेहर्यावरचे भाव टिपले...हलकी हलकी पावले टाकत मी तिच्या पाशी जात होतो...तिने माझ्या कड़े पाहिल...माझी पावले तिच्याकडेच येताना पाहत ती मनातून खुश होत होती...एका क्षणी मी तिच्या अगदी समोर येवून उभा राहिलो...ती नजर वर करुण माझ्या नजरेत पाहत होती...मी काहीतरी बोलेल ह्या आशेने तिने कान टवकारले होते...का कुणास ठावुक मला का वाटल आणि मी तिच्या समोर गुडघ्यावर बसलो...तिच्या चेहर्याकड़े पाहतच...काहीच न बोलता मी माझा हात तिच्या समोर पुढे केला...तिनेही क्षणाचा विलंब न लावता त्या पुष्पगुच्छातुन एक गुलाब अलगद काढून मला देवू केला...बहुतेक मी ही मनात ह्याच क्षणाची आणि तिच्या ह्याच प्रतिक्रियेची वाट पाहत होतो...तिने देवू केलेला तो गुलाब मी स्मितहास्य करीत स्वीकारला...माझ्या ह्या स्मितहास्याने तिच्या चेहर्यावरही एक वेग्ळाच आनंद पसरला, निरागस डोळ्यात विलक्षण तेज आल होत...वाटत होत तिचा तो आनंद कायम डोळ्यात साठवून ठेवावा...

मग मीही माझ्या खिशात हात घालून एक नोट बाहेर काढली...आणि तिच्या हातावर टेकवली...10-12 वर्षाची गडद पिवळा फ्रॉक घातलेली, अनवाणी पायाने तळपत्या उन्हात गुलाब विकत उभी असलेल्या तिने उरलेले पैसे पुन्हा मला देवू केले...गोंडस आणि निरागस त्या गुलाबकळि च्या चेहर्यावरचे भाव  आणि त्यावर ओसंडून वाहणारा आनंद  त्या लाल टपोरी गुलाबाला फीका पाड़त होता...खरच इतक्याश्या एका गुलाबात ही इतका भलामोठा आनंद लपलेला असतो हे तेव्हा कळाल.

-प्रफुल्ल शेंड्गे
Http://prafulla-s.blogspot.in

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-