प्रेम कथा तर तुम्ही खूप ऐकल्या , पाहिल्या , वाचल्याही असतील ... प्रेमावरच्या कविताही तितक्याच ... पण त्यातल्या बर्याचशा कविता मुलांच्या नजरेतून लिहल्या गेलेल्या असतात .. म्हणजे तिला जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्या मनातली गोष्ट ... तिच्या अलौकिक सौंदर्याच्या वर्णन करणाऱ्या ओळी .... रेशमी केस , गोरे गाल , गुलाबी ओठा पासून ते तिची तुरु-तुरु चाल ह्या पर्यंत..सारच अप्रतिम वर्णन ... पण ह्यासोबतच एक विचार मनात आला कि , जस मुल मुलींच्या प्रेमात पडतात तसच मुली हि पडत असतील न कुठल्यातरी मुलाच्या प्रेमात...ते हि स्वताहून ...मग काय विचार करत असतील हो त्या वेळी ... त्या पण लिहित असतील का मुलांवर कविता ... ज्यात त्यांनी वर्णल असेल मुलाचं चित्र जस ... त्याच्या दाट भुवया , पिळदार मिशी , दाढी , त्याच्या चालण्याची स्टांईल वगैरे, जस मुलांना साडीतली मुलगी आवडते मग काय मुलीना धोतर आणि पगडीतला मुलगा तर आवडत नसेल ना ?.... विचार करूनच तस भयानक वाटायला लागलय... पण खरच अस असेल तर .. कशी होत असेल प्रेमाची सुरुवात मुलींच्या बाजूने ... अशाच एका मुलाच्या प्रेमात पडलेल्या मुलीची प्रेम कहाणी तिच्या डायरीतून ...
दिनांक ०१-०७-२००८
आजचा दिवस वेगळाच होता ... वेगळा म्हणजे माझ्या स्वप्नातला तो दिवस ...आज सेकंड इअर चा पहिला दिवस .... कॉलेज च्या पार्किंग मध्ये माझी स्कूटी पार्क करत होते ... तोच एक बाईक घेवून मुलगा पार्किंग एरिया मध्ये आला ... बाईक थांबवून त्याने डोक्यावरून हेल्मेट काढल .. बाईक च्या हैंडल वर ते अडकवून तो बाईक वरून उतरला तोच त्याचा चेहरा माझ्या नजरेसमोर आला ... हेल्मेट मुले थोडे केस विस्कटले होते ... त्याने हातानेच त्याचा भांग पाडला ... चेहऱ्यावर हलकीशी दाढी , छान ट्रिम केलेली मिशी ... डोळ्यातला भाव तर प्रेमात पाडणाराच ... अंगावर मुलांचा अघोषित गणवेश ... निळी जीन्स आणि त्यावर पांढरा शर्ट ... पण हे कॉम्बिनेशन त्याच्यावर जास्तच सूट होत होता ... उंच , मध्यम बांधा ... काहीवेळ तर मी त्याच्या कडे एकटक पाहतच राहिली ... काय झाल होत मला, माझ - मलाच कळाल नाही... बहुतेक त्याला कलाल होत कि काय मी त्याच्या कडेच पाहतेय त्याने पुन्हा माझ्याकडे पाहिलं ... मी लगेच नजर सावरून तिथून निघाली आणि माझ्या क्लास मध्ये जावून बसली ... पण त्याचा विचार माझ्या मनातून काही जाईना .. राहून राहून त्याचा चेहरा डोळ्यासमोर येत होता ... क्लास मध्ये सर आले आणि मी बैगेतून नोट बुक काढायला लागली तोच माझी नजर अचानक मुलांच्या बेंचवर गेली ... आणि पुन्हा नजरेसमोर तोच ... भास होता कि काय वाटल म्हणून परत एकदा पाहिलं ...खरच तोच होता तो ... माझ्या ओठांवर हसू उमटलं ... आता मात्र मी माझ भान विसरायला लागली होती ... दुपारच्या ब्रेक मध्ये सगळ्यांशी बोलता बोलता कलाल कि दुसर्या बैच मधली काही जन आमच्या क्लास मध्ये आली होती ... आणि तो हि त्यातलाच एक होता ... आजचा सारा दिवस त्याला आठवण्यात आणि त्याला हळूच चोरून पाहण्यात गेला
दिनांक :- ०२-०९-२००८
आज पहिल्यांदा माझ आणि त्याच बोलन झाल ... असाइनमेंट ची बुक मागण्यासाठी तो माझ्याशी बोलला ... तो माझ्याशी बोलत होता आणि माझ त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हत मी त्याच्या कडेच बघत होती त्याने दोन वेळा मला विचारल तेव्हा कुठ माझ त्याच्या बोलण्याकडे लक्ष गेल ...
दिनांक :- २७ -१० -२००८
आता आमची बर्या पैकी मैत्री झाली होती ... त्याचा स्वभाव मला समजत होता ... कधी खोडकर ... कधी शांत पण मनातून तेवढाच समंजस ... आज मीच त्याला त्याचा मोबाइल नंबर विचारला आणि कॉलेज मधून घरी आल्यावर त्याला एक मेसेज पाठवला ... त्याच्या रिप्लाय ची मी वाट पहायला लागली होती ... पण त्याचा रिप्लाय काही येयीना ... काय वाटल असेल त्याला हाच विचार मनात यायला लागला होता .... पण तासाभरा नंतर त्याच रिप्लाय आला तेव्हा जीवाला कुठ बर वाटल ... आणि मग सारखा त्याचा तो मेसेज उघडून पाहत होती मी
दिनांक :- १६ -०१ -२००९
आज कॉलेज मध्ये साडी डे होता , मी हि साडी नेसून मध्ये गेले होते , कॉलेज मध्ये गेल्यावर पाहिलं कि त्याचा शर्टचा आणि माझ्या साडीचा रंग एकच होता ... ह्याला तस काही लॉजिक नव्हत पण का माहित नाही मला हे जाम भारी वाटत होत . पण तो दुसर्या मुलींशी बोलत होता , त्यांच्या सोबत फोटो काढत होता ना तेव्हा मात्र मला त्याचा राग येत होता ...पण काही वेळानी तो माझ्यापाशी येवून बोलू लागला ... "छान दिसतेस " अस मला म्ह्ह्तल्यावर माझ मन थोड्या वेळ हवेतच उड्या मारायला लागल होत आणि त्यासोबतच त्याचावरचा राग पण कमी झाला ... किती विचित्र वागतेय ना मी ? पण हे सार मला फार आवडतय .
दिनांक :- २३ -१२ -२००९
फार दिवसापासून मनात चालू होत कि त्याला माझ्या मनातल त्याला सांगून टाकाव ... पण हिम्मत होत नव्हती ... आणि तो हि काही बोलत नव्हता ... त्याला माझ्या बद्दल काय वाटत होत ते मला स्पष्ट काही कळत नव्हत... पण आज त्याला सांगायचं अस ठरवलं होत ... लंच ब्रेक मध्ये त्याला म्हटल मला तुझ्याशी बोलायचं आहे ... आणि आम्ही कॉलेज च्या कॅम्पस मध्ये गेलो ... इकडचा तिकडचा विषय काढून बोलन सुरु केल आणि थोड्या वेळानी मी माझ्या मुद्द्यावर आली आणि मी त्याला माझ त्याच्यावर असलेल्या प्रेमा बद्दल स्पष्ट सांगितल ..आय लव्ह यु म्हणून प्रपोसे पण केल ... ते ऐकून तो गालात हसला .. थोडा वेळ तसाच गालात हसत आणि लाजत राहिला ... त्याचा तो गुलाबी पडलेला चेहरा पाहून मला हि मनातून आनद होत होता ... आणि त्याने सुद्धा आधी नजरेने आणि मग बोलून माझ्यावरच प्रेम व्यक्त केल ... त्यावेळची हूर हूर , आनंद शब्दात मांडताच येत नाहीये मला ...हा दिवस आणि डायरीतल हे पान माझ्या आयुष्यातल सगळ्यात महत्वाच होणार आहे कायमच. म्हणूनच ह्याच पानावर तुझ्यासाठीच्या या चार ओळी
पहिल्याच भेटीत त्याच्या, मी स्वताला हरवून गेले ,
नकळत कधी कसे ,त्याच्या प्रेमात बुडून गेले.
अर्थ प्रीतीचा मज, तुझ्यामुळेच उमगला,
असा तू राजकुमार, माझ्या मनी विसावला .
आणि आजही प्रत्येक दिवसागणिक तिच्या ह्या डायरीतली पान त्याच्या बद्दल , त्यांच्या प्रेमाबद्दल लिहिता लिहिता भरत चालली आहेत... पण काय नक्की दडलय असेल हो डायरीच्या ह्या पुढच्या पानांत ?
No comments:
Post a Comment
कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-