तिच्या शब्दातून ....अधांतरी(?)

त्याला कदाचित वाटत असेल मी त्याला इग्नोर करतेय , करतेय मी त्याला इग्नोर पण मुद्दाम. त्याने पुन्हा मनाने माझ्या आणखी जवळ याव म्हणून . मला हि आवडत नाही , मला हि त्रास होतो त्याच्याशी न बोलून पण मी नाही बोलली तर तो स्वताहून बोलायला येतो ना ते खूप आवडत मला , त्याच माझ्याबद्दल विचार करण , माझ्याबाबतीत पजेसीव होण एक वेगळच थ्रील देत मला .

दिवस दिवस गप्प राहून झाल्यावर तो जेव्हा स्वताहून बोलातो नां त्यावेळी मला जो आनंद होतो तो शब्दात न सांगण्यासारखा , पाउस पडून गेल्यावर घरट्यातली पाखर कशी पुन्हा आकाशात उंच भरारी घेतात ना तस माझ मन त्याच्या निखळ प्रेमाच्या आसमंतात उडायला लागत. तुम्हाला हा वेडेपणा वाटत असेल पण काय करू त्याच्यासोबतच्या प्रेमात मी पण वेडी झालीय . तो जे शब्दांच्या आडून प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न करतो ना ते समजत मला पण तरीही मी गप्प राहते , काही रिप्लाय देत नाही. कधी कधी मुद्दाम वेगळा विषय पुढे करते , वाटत तो अजून खुलेपणाने बोलेल माझ्याशी , पण तो वेडा , मला त्याच बोलन आवडल नसेल , मी रागावली असेल असा विचार करत राहतो , आता प्रत्येक गोष्ट सांगावी का मी त्याला ? समजू नये का त्याला माझ्या मनातल ? वेडा कुठला ... आता त्यादिवशी त्याने असच शब्दांच्या आडून आडून मला प्रपोज केल ... , माझ मन आनंदाने हवेत गिरक्या घ्यायला लागल होत , माझ्या चेहर्यावरची स्माईल दुप्पट खुलली होती , पण मुद्दाम त्याला जळवण्यासाठी मी नकार दिला आणि थोड्या वेळासाठी बोलन टाळल. वाटल होत तो अजून स्पष्टपने व्यक्त होईल ... पण झाल उलटंच माझ गप्प राहण पाहून हा पठ्ठा म्हणतो कसा "सोर्री , मि असच म्हटल , मला अस नव्हत बोलायचं, तुला वाईट वाटल असेल नां ". त्याच हे बोलन ऐकून माझ हवेत गिरक्या घेणार स्वप्नांचं विमान धाड्कन जमिनीवर आपटल . काय सांगू तुम्हला त्या वेळी किती राग आला होता मला त्याचा .समोर असता ना मारच खाल्ला असता माझा , अरे थोडा वेळ तरी द्यायचा मला उत्तर देण्यासाठी , मी बोलले होते ना नंतर बोलते म्हणून , जरा धीर धरायचा ना ,अस म्हणत मी मनातल्या मनात राग व्यक्त करायला लागले , त्यात मला त्याच्यापेक्षा स्वतावर जास्त राग यायला लागला होता , माझ्याच अशा वागण्याने तो तसा म्हणाला असेल , माझी काळजी वाटली असेल ,मी त्याच्यापासून दूर होईल ह्याची भीती वाटली असेल कदाचित ...बिच्चारा .

अस म्हणत मी त्याच्या स्वभावात आणि स्वप्नात हरवून गेले , पण मनात ती प्रेम व्यक्त करण्याची हरवून गेलेली संधी मात्र टोचत होती, एकवेळ मनात विचार आला "मीच सांगू का त्याला " पण दुसर्याच क्षणी " मुली कधी स्वताहून सांगत नसतात" हा अलिखित नियम आठवला , आणि मी माझा सांगायचा निर्णय मागे घेतला .

कदाचित तुम्हाला वाटत असेल हा माझा इगो वगैरे आहे कि काय ... पण इगो अस काही नाही पण मला त्याच्या डोळ्यातल माझ्याविषयीच ओसंडून वाहणार प्रेम बघायचं होत , त्याच्या मनात साठलेले शब्द ओठांवर येताना पाहायचे होते . आता फ़्क़्त गरज आहे ती त्याने पुन्हा एकदा थेट माझ्यासाठी त्याचा हात पुढे करायची. मला सावरण्यासाठी ,हातात हात पकडून त्याच्या आयुष्यात घेवून जाण्यासाठी , मी तयार आहे माझ्या आयुष्य रेषा त्याच्या तळहातावर सोपवायला .

डोळे बंद करत त्याला आठवून आजकल मी नेहमी स्वतःशीच मनात बोलत राहते " देशील ना तुझा हात माझ्या हातात ? ह्यावेळी नकार नाही देणार मी तुला , प्रॉमिस ."

-प्रफुल्ल शेंड्गे

2 comments:

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-