साथ

आजूबाजूला मंद प्रकाश पडलेला , अंगावर येनारी वार्याची हळुवार झुळूक , दुर कुठेतरी वाजणारं एखाद गाणं,माणसांची गर्दी ,गोंधळ आणि ह्या सार्यात एका कोपर्यात बसलेली "ती" दोघं. त्याच्या खांद्यावर तीच अलगद डोक ठेवून, दोघांच बारीकश्या आवाजात एकमेकांशी बोलन चालू होत. थोड्यावेळा साठी तो बोलायचा थांबला , त्याने तिचा हात हातात घेतला आणि पुन्हा बोलन सुरु केल , येणारे-जाणारे वळून वळून त्यांच्या कडे पहायचे , आणि पुन्हा आपल्या रस्त्याने पुढे निघून जायचे . दोघेही भलत्याच दुनियेत गुंगलेली .दोघांच्या बोलण्याला गर्दीचा किंवा तिथल्या आवाजाचा परिणाम होत नसला तरी ते येणाऱ्या प्रत्येक माणसांच्या चेहऱ्याकडे बघायचे आणि पुन्हा आपल्या गप्पात अडकून जायचे , चेहऱ्यावर नैसर्गिक समाधान तरीही डोक्यात प्रश्नाचं काहूर माजाव असे भाव दोघांच्या हि चेहऱ्यावर उमटले होते. सूर्य बुडण्याची वेळ झाली आणि अंधार पडायला लागला,आजूबाजूचे दिवे लागायला लागले, तशी त्यांच्या चेहर्यावरची काळजी अधिकच गडद व्हायला लागली होती. एका क्षणी तो उठला ,
"आता जावून काय उपयोग ?" अस बोलून तीने त्याला अडवलं ,
"पण काहीतरी कराव लागेलच ना ?" त्याने उत्तर दिल.

"काय करणार आपण ?" तिने प्रतिप्रश्न केला ,
ह्या वेळी मात्र त्याच्या कडे काहीच उत्तर नव्हत , तो तसाच पुन्हा खाली बसला. स्वतावर चीड आणत तो स्वताशीच पुटपुटत होता , ती मात्र त्याला शांत कारायचा प्रयत्न करत होती.

वेळ पुढे जात होती ,रात्रीचे सुमारे १०-११ वाजले होते , तेवढ्यात समोरून कुणीतरी त्यांच्या दिशेने येतंय अस त्या दोघांच्या हि लक्षात आल , दोघ हि त्या येणाऱ्या व्यक्ती कडे आशावादी चेहऱ्याने एकटक पाहत होते. ती समोरची व्यक्ती त्यांच्या पाशी आली आणि एक पिशवी त्यांच्या समोर ठेवून तिथून निघून गेली. तिने पिशवी झटकन उचलली आणि उघडायला लागली, आत हाथ घालून तिने पिशवीतून काहीतरी बाहेर काढल. पाहून तिच्या जीवात जीव आला , मघापासून असलेली चिंता काहीशी दूर झाल्यागत तिने त्याच्या कडे पाहिलं. त्यानेही काहीश्या चिंता मुक्त नजरेने तिच्या कडे आणि त्या पिशवी कडे पाहिलं , पिशवीतून काढलेल्या एका चपाती कडे आणि त्यात गुंडाळलेल्या भाजी कडे दोघही बघत होती. लगबगीने तिने तिच्या कुशीत निजलेल्या मुलाला उठवल आणि चपातीचा एकेक तुकडा तोडून त्याला चरायला लागली , तो हि बाजूलाच असलेल्या नळातून पाणी आणायला धावला, मुलाच्या पोटात जेवण जाताना दोघांच्या हि पापण्या ओल्या होत होत्या...बहुतेक आनंद आश्रुने. भुकेल्या त्या जीवाने आर्धी चपाती संपवली आणि "बास झाल " अशा अर्थाने मान हलवली. ,.

"तुम्ही खावून घ्या , मला भूक नाहीये " अस म्हणत तिने अर्ध्या राहिलेल्या चपातीचा तुकडा त्याच्याकडे दिला, त्याने नको म्हणत मान हालवली , पण ती काही ऐकायला तयार नव्हती , त्याने मग तिच्या कडून ती अर्धी चपाती घेतली आणि दोन भाग करून एक तिला आणि दुसरा स्वताकडे ठेवला...

"आज नाही भेटल काम, पण उद्या नक्की भेटेल..हातावरच पोट ना आपल थोडे हाल काढावेच लागणार ना?", तिने हलकेच मान हालवून त्याच्या बोलण्याला हो दिला,

"तुम्ही कशाला काळजी करता, मी आहे ना तुमच्या सोबत, भेटेल उद्या आपल्या हाताला काम. " अस म्हणत तिने त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला . आपल्या मुलाकडे पाहत, पोटातली आणि दिवसाच्या दु:खाची आग शमवण्याचा प्रयत्न करत ते दोघेही उरलेल्या चपातीचा तुकडा गिळत होते .

एक मात्र नक्की ....एकमेकाना समजुन घेत,प्रत्येक परिस्थितीत आपल्या माणसांची साथ-सोबत आसणं हेचं सगळ्या गोष्टींवरच रामबाण औषध असत.

-प्रफुल्ल शेंडगे.

तारुण्याच्या झळा




                       सिग्नल  बघितलाच असेल तुम्ही ... लाल ,पिवळा आणि हिरव्या दिव्यानी नटलेला . हे तीन दिवे मला तर ना माणसाच्या आयुष्यातल्या तीन टप्प्यांसारखे वाटतात .सर्वात खालचा हिरवा म्हणजे बालपण , वरचा लाल म्हणजे उतारवय आणि मधला पिवळा दिवा म्हणजे तारुण्याचा काळ. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल ह्या आपल्या आयुष्याच्या टप्प्यां मध्ये आणि ह्या तीन दिव्यांमध्ये अस काय साम्य आहे ? तर , हिरवा दिवा असला कि रस्त्यावरच्या गाड्या मुक्त पाने धावायला लागतात , तसच बालपण असत मुक्तपणे जगता येणार  , लाल म्हणजे थांबण  ,उतारवयात सारी अवयव थकून जातात आणि माणसाला थांबायला लागत म्हणून हा लाल रंग , आणि आता पिवळ्या दिव्या बद्दल बोलायचं तर , ह्या पिवळ्या दिव्याला काही महत्व नसल्यासारखं आपण त्याच्याकडे पाहत असतो अगदी तसंच तारुण्यात आलेल्या आमच्या सारख्या मुलांकडे सार जग पाहत असत . "अरे एवढा मोठा गधडा झालास, लहान आहेस का तूला सगळ सांगायला ? लय मोठा झाला का तू ? , तुला काय समजतं ? किंवा मोठ्या माणसांसारख लय समजतंय का तुला? अशी एक ना एक बोलणी रोजच तारुण्यात आलेल्या प्रत्येकाला ऐकून घ्यावी लागतात . अहो फ़्क़्त घरातलाचं कशाला अगदी बाहेर कामाच्या ठिकाणी सुद्धा ह्या तारुण्याच्या झळा सोसाव्याच लागतात , उदाहरण द्यायचंचं  झाल तर " अरे तुम्ही तरुण मुलं , भरपूर काम करायला पाहिजे तुम्ही ,कसे आजारी पडता रे तुम्ही ह्या वयात ?,कसे थकता रे तुम्ही एवढंसं  काम करून, आम्ही आमच्या तरुणपणी किती काम करायचो माहिती आहे का ?  , कशाला पाहिजेत रे तुम्हाला सुट्ट्या?,  तुम्हाला का घर संसार आहे का ? पस्तीसी-चाळीशी नंतर करा कि मजा,आता  तुम्ही लहान आहत .  अशी  अनेक ठरलेली वाक्य  सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत ऐकावी लागतात (चं).अशा वेळी मात्र  मनात व्दिधा स्थिती निर्माण व्हायला लागते , आपण खरचं मोठे झालोत कि आपण लहान आहोत ? लहान म्हणून जगायचं तरी बोलन खायचं आणि मोठ म्हणून जगायचं तरी बोलन खायचं अशी अवस्था होते . पण सांगणार तरी कुणाला ? ऐकणारे आहेत तरी कोण ? आणि  ऐकणारे असले तरी समजून कोण घेणार हा प्रश्न असतोच .


जबाबदारी , कर्तव्य , मान-सन्मान , काळजी , अशा अनेक गोष्टींच ओझ घेवून, त्या सांभाळत जगणाऱ्या ह्या तरुण पिढी कडे पाहतो तरी कोण आणि कसा ?   आमच्याकडे फ़्क़्त उनाड , बेशिस्त ,विचारशून्य , स्वताच्या गुंगीत राहणारे अशा नजरेने का पाहता ? खरच  तुमच्या तरुणपणी इतकेच आदर्शवादी राहत होता का ,जितक्याची अपेक्षा तुम्ही करता आहात तितके ? अपेक्षा करण किंवा सांगण काहीच चुकीचं नाहीये , आम्हालाहि तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहेच , पण किमान आम्हाला समजून तरी घ्या . शेवटी आम्ही हि माणसच आहोत.

 रस्त्यावरची वाहतूक सुरुळीत राहण्यासाठी जशी फ़्क़्त  लाल आणि हिरव्या दिव्याची गरज नाही लागत, लाल आणि हिरव्या दिव्याच्या मध्ये जो  पिवळ्या दिव्यासाठी वेळ दिला जातो तो आयुष्याच्या टप्प्यांमधल्या
दिव्याला अर्थात तारुण्याला पण द्या, उगाच नको फ़्क़्त उठता बसता शब्दांची बोचणी, खुलुद्या दया त्यांच्या विचारांना त्यांच्या स्वताच्या सूर्यप्रकाशात ....आणि बसलेच चटके उन्हाचे तर आहेच की तुमची सावली...ती ठेवूच आम्ही ध्यानात .

-प्रफुल्ल शेंडगे

आरसा





रोज सकाळी आपण सारेच जन आरशा समोर उभ राहून स्वता:ला न्याहाळत असतो .  पण फ़्क़्त स्वतःच्या बाह्यवर्णनाला. अंतरंगात ढुंकून पाहता येणारा आरसा अजून तरी काही अस्तित्वात आला नाही .अगदीच अस्तित्वात नाहीये अस नाही , दुसऱ्यांच्या नजरेत आपल्या अंतरंगाचा आरसा ठळकपाने दिसत असतोच कि. पण हा खरा आरसा कि खोटा हे कस ओळखायचं ? खरा-खोटा म्हणण्या मागे कारण हि आहे ते म्हणजे, आपल्या नेहमीच्या आरशात समोर जे काही, जस येयील तसं तो दाखवत असतो पण नजरेच्या आरशाचं मात्र तस नसतं ,कारण ह्या नजरेच्या आरशाला त्या माणसाची स्वताची मतं चिकटलेली असतात . मग तुम्ही कितीही चांगले वागत असलात तरी समोरचा तुमच वागणं ज्या पद्धतीने घेतो त्याप्रमाणे तुमच्या वागण्याचं प्रतिबिंब त्याच्या नजरेत उतरतं असत . जो तो त्याच्या सोयीप्रमाणे आपल्या वागण्याचा अर्थ काढत राहतो .आणि मग कधी कुणाच्या नजरेत आपल्या बद्दल ची काही नकारत्मक प्रतिबिंब पाहिली कि मनात अस्वस्थता निर्माण होवून चिडचिड व्हायला होते . "माझ म्हणन-वागण कुणाला कळतच का नाही ?, एकदा माझ्या बाजूने विचार करून बघा , एकदा माझ्या जागी स्वताला ठेवून बघा .  " असे एक ना अनेक वाक्य ऐकायला मिळतात किंवा समोरच्याला ऐकवावे  लागतात.


पण समोरचा आपल्या बद्दल कसा आणि काय विचार करत असेल हे हि पाह्ण्याच तंत्र कुठाय आपल्याकडे ? मग वाट्त राहत  केदार शिंदेच्या "अग्ग बाई अरेच्चा " सिनेमातल्या साराखं आपल्याला सामोरच्याच्या मनातल कळायला हवं  होतं . दोन क्षणा साठी का होईना समोरच्याच्या नजरेने आपण स्वता:ला बघू शकायला हवं होतं , कुणी आपलं का कौतुक कराव किंवा कुणी आपल्याबद्दल का वाईट का बोलत असेल हे स्वताला समजायला हवं होतं .


पण ह्या झाल्या साऱ्या जादुई कल्पना , अस काही होणं तसं अवघडचं ! कारण माणसाच्या मनाचा काही भरोवसा नाही . जिथ आपलच मन किती वेळा एका गोष्टीवरून, मतावरून उड्या मारतं  मग बाकीच्यांच्या मनाची किंवा विचार करण्याची पद्धत कशी काय आपल्याला उलगडणार ?
पण ह्या सार्यांवर एक उपाय आहे, आपण आपल्या मनाशी प्रामाणिक राहून  काम करणं. आणि जर आपण आपल्या मनाशी प्रामाणिक वागत असलो तर मग समोरचा आपल्या बद्दल काय विचार करतो हे जाणून घेवून त्याचं पद्धतीने वागण्याची तशी फारशी गरज उरणार नाही. शेवटी जसं समोरच्याची नजर आपल्या अंतरंगाचा आरसा दाखवते त्याप्रमाणेच आपल मन सुध्दा आपल्या वागण्याचा आरसा असतोच कि आणि तो हि साधासुधा नाही "स्नोव व्हाईट" च्या कथेतल्या जादुई आरशासारखा जो कधीच खोटं बोलतं नाही, अगदी तसाचं  .

-प्रफुल्ल शेंडगे.

प्रेमाची ज्योमेट्री(भूमिति)

ती जणू 'केंद्रबिंदु '
मी तिचा 'परिघ' होतो.
कुठेही असलो तरी
तिच्याच भोवती फिरत होतो.

तिच्या माझ्या 'त्रिज्ये' मध्ये
नवा 'ट्रायंगल' पॉइंट आला.
मला बाजुला सारून
त्यांचा एंगल सेट झाला.

ट्रायंगल च्या दोन बाजुंचे
कालांतराने 'चौकोण' झाले.
'(e)x ' च्या शोकात ,माझे
न सुटनारे equation झाले.

चौकोनाच्या आयुष्यात
पहिल्या वर्षी 'पंचकोन ' ;
दुसर्या वर्षी छोटा 'षटकोण' आला.

नव्या केन्द्रबिंदु भोवती
माझा पुन्हा परिघ झाला.

-प्रफुल्ल शेंड्गे
Http://prafulla-s.blogspot.in

बाप्पा बोलला आज....

     गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो होतो आणि तितक्यात लाइट् गेली ,स्पीकर वर वाजनारी गाणी बंद झाली आणि एक अद्भुत शांतता पसरली . माझ लक्ष बाप्पा कड़े गेल ,बाप्पा  स्वता:शीच काहीसा पुटपुटताना दिसला...मनात विचार आला काय बर बोलत असेल बाप्पा स्वता:शी ?...आजुबाजुला कोणी नसल्याच पाहत विचारायच धाडस केल..."काय झाल बाप्पा?" पण बाप्पा काहीच न ऐकल्या सारखा बघत होता मी पुन्हा प्रश्न केला...तेव्हा बाप्पा नि माझ्या ओठांची हालचाल पाहिली आणि कानात हात घालून कापसाचे बोळे बाहेर काढले...धक्काच बसला मला बाप्पा ला विचारल काय रे हे बाप्पा तू कानात कापसाचे बोळे घालून बसलास? आणि काय पुटपुटतोयस स्वता:शिच?
नाराजीच्या सुरात बाप्पा नि उत्तर द्यायला सुरुवात केलि, "काय करू रे,वैताग आलाय,किती आनंदाने तुमच्या कड़े यायला निघालो होतो,किती खुश होतो काय सांगू तुला...पण इथ येवून सारा हिरमोड झालय बघ.

     वाटल होत तुमच्याशी संवाद साधता येईल...तुमच्या चेहर्यावरचा निरागस आनंद पाहता येईल पण  इथे येईपर्यन्तच नको नकोस वाटायल लागल होत मला...येताना रस्त्यावरुण माझी मिरवणुक काढत इथपर्यन्त आणल ...रस्त्यातल्या खड्ड्यातुन येताना पूर्ण पाठ दुखायला लागली आणि त्यात ह्यांचा धांगडधींगा...मोठ्यानी गाणी,ढोलताशा चा गजर,त्यावर ह्यांचे वेडेवाकडे डांस, बस वर चढून नाचण ,रस्ता आडवूण,इतराना त्रास देवून मला कस काय प्रसन्न करणार ? बरं...मला चार-चार हात दिलेत,पण त्यापैकी तिन्ही हातात काहीना काही दिलय मग काय आशीर्वादाचाच हात मी स्वताच्या कपाळा वर मारून घेतला...मग आशीर्वाद कुणाला कसा काय देवू?
ते हि कमी की काय म्हणून मला इथ येवून बसवलं आणि माझ्या दोन्ही काना शेजारी दोन स्पीकर आणून ठेवलेत....त्यावर सतत जोरजोरात गाणी सुरूच असतात...पहिल्यांदाच मला माझ्या ह्या मोठ्या कानांचा पश्चाताप होतोय. म्हणून मी कानात बोळे घालून बसलोय आणि त्यामुळे माझ्या दर्शनाला आलेल्यांच म्हननं ही मला ऐकायला येत नाहिये ,तुम्हाला तरी तुमच स्वताच म्हनन ऐकायला येतय का? नाही ना ? तरी नंतर तुम्हीच म्हणता की बाप्पा आमच ऐकतच नाही..आता तूच सांग मला कस काय तुमच म्हणन ऐकू येईल?

      ही तर सार्वजनिक मंडळा मधली माझी अवस्था पण घरगुती गणपति मधली ही अवस्था वेगळी नाही...आधी मी आलो की घरातले सगळी माणस एकत्र यायची,गोतावळा जमा व्हायचा,घरातली सारी माणस कशी खुश, उत्साहित असायची,एकमुखाने आरती गायची. आता मात्र कुटुंब विभक्त झालीत, प्रत्येकाच्या घरी वेगवेगळा गणपति...मग काय सर्वानी एकत्र यायची प्रथा बंदच झाली,एकमुखाने गायली जाणारी आरती ही आता CD /कैसेट्स लावून गायली जाते,भक्तीचा ओलावा राहिलाच नाही कुठे. माझ्या नावाने स्पर्धा सुरु झाल्यात, ह्यानी 5 फुट उंच मूर्ति आणली की तो 10 फुट आणतो, ह्याने इतक्या रुपयाची सजावट केलि की दूसरा त्याच्या पेक्षा जास्त खर्च करायला लागतो.पण ह्याना का कळत नाही मला नको ही असली सजावट, नको हां मोठेपणा,तुमचा साधेपणा,त्यात असलेली निखळ,निरागस भक्ति चा भुकेला आहे मी,लाडू-मोदक नसले तरी मी रागवत नाही रे.आजकल तर माझा उपयोग  फक्त सेल्फ़ि घेण्यासाठी, आणि तो सोशल साईट वर टाकण्या साठीच उरला आहे. एक-एकदा वाटत निघून जावं तुमच्यातुन ,पुढच्या वर्षी ही न येण्यासाठी पण काय करू काही जन आहेत जे मनापासून मला बोलावतात त्यांच्या साठी मला यावच लागत...हे तर वर्ष गेल पण पुढल्या वर्षी तरी असल काही करू नका...सण करा रे पण त्याचा त्रास होउ देवू नका.

          बाप्पा बोलत होता पण अचानक त्याचा आवाज माझ्यापर्यन्त येनं बंद झालं,लाइट्स आल्या होत्या आणि स्पीकर मधली गाणी पुन्हा जोराने वाजायला लागली होती, मी बाप्पा कड़े पाहत तसाच उभा होतो , बाप्पा मात्र पुन्हा कापसाचे बोळे कानात घालून स्वताशिच पुटपुटायला लागला.तितक्यात मागुन कोणीतरी आवाज दिला.."चला पुढे,लोकाना दर्शन घ्यायचय"...आणि मी तिथून बाहेर पडलो ते बाप्पाच्या म्हणन्याचा विचार करतचं.

-प्रफुल्ल शेंड्गे

चाय पे चर्चा

थांबा ! थांबा !! ...नाही...नाही मी काही कुठल्या राजकीय विषयावर नाही बोलत आहे . ही "ती" वाली  "चाय पे चर्चा " नाहीये , अहो मी तर आपल्या चहा बद्दल बोलतोय . तुमच्या , आमच्या कपातल्या चहा बद्दल . काय म्हणता चहाचं नाव काढल आणि तुम्हाला ही चहा पिण्याची तलफ झाली ? मला ही तसचं वाटल  म्हणून आधीच सोबत चहाचा कप  घेवून बसलोय ..म्हणजे  तुमच्याशी बोलताना सोबत एक-एक घोट चहा असला ना कस मस्त वाटत . आssssssहा काय चहा आहे ....व्वा ....मस्त.

चहा बद्दल वेगळ काय सांगायचं ...आपल्या सगळ्यांची सकाळ ज्या गोष्टीविना अधुरी आहे तो म्हणजे चहा . एका हातात सकाळचा वर्तमान पेपर दुसर्या हातात चहाच्या कपाचा कान  ,पेपर ची एक हेडलाईन आणि त्यासोबत चहाचा एक-एक घोट सकाळची आणि दिवसाची छानशी सुंदरशी सुरुवात करून द्यायला पुरेसा आहे .

जसं आपण आपल्या दररोज च्या आयुष्यात चहाला स्थान दिलय त्याप्रमाणे चहाने  ही आपल्याला सांभाळून घेतलं आहे ....काय म्हणता ? कस ? अहो बघा ना , बेड-टी च्या नावाखाली आपण न तोंड धुता चहा प्यायची सवय लावली खरी पण चहा नि कधी तुमच्या समोर नाक मुरडलयं का? ...न तोंड धुता का मला पितोस असं कधी विचारलयं का?  नाही ना ?  सकाळचा नाश्त्याला दुसरं काही नाही मिळाल तरी अगदी चहा-चपाती ने ही काम होत आपलं, अगदी कंटाळा आला तरी तो घालवण्यासाठी चहा लागतोच...शाळेच्या दिवसात परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करताना आईने बनवून दिलेला चहा असो किंवा कॉलेज कट्ट्या वर मित्रांसोबत ची  कटिंग चाय ....थंडी ची लाट किंवा पावसाच्या सरी आल्या की ओघाने चहा आणि भजी चा बेत आलाच ...ऑफिस मध्ये तर चहा नि आम्हाला खूप सांभाळलय , किंबहुना ,ऑफिस ला जाण्याच्या कारणा मध्ये चहा ही एक आहेच ... आमच्या ऑफिस चा चहा जरा वेगळाच असतो...उकळलेलं रंगीत पाणी ;फक्त कैंटीन वाला ते कपात देतो म्हणून त्याला चहा म्हनाव लागतं इतकचं . असो ...पण हाच चहा दुपारच्या जेवना नंतर येनारया सुस्तीला पळवुन लावण्यासाठी पुरेसा होतो.


तसं ही आपल्याकडे आजकल चहा फक्त पिण्या पुरता विषय राहिला नाहिये..तुम्हीच बघा ...कुठल्या ही कामाला "चहापाणाला" पैसे द्यावेच लागतात...संसदेच असो किंवा विधानसभेच अधिवेशन...विरोधाकांचा "चहा पाणावर बहिष्कार" ही बातमी वाचल्याशिवाय अधिवेशन सुरु झालयं ते कळतचं नाही. कुणाला सांगू नका पण लोक म्ह्नातायेत की ह्यवेळच्या निवडनुका चहानेच जिंकुन दिल्यात..ते काय म्हणतात ना 'चाय पे चर्चा' करुण. अहो राजकारणच कशाला "गरम चाय की प्याली" असो किंवा "मम्मी ने चाय पे बुलाया है" ह्या गाण्यातून समजतं की चहा नि बोलिवूड़ वर ही मोहिनी घातली आहे ते ..."चाय पे बुलाया" वरुण आठवलं ; डेटिंगच्या वेळी "कॉफ़ी प्यायला जावुया" अस म्हणून जरी सुरुवात होत असली तरी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात मुलगी जोपर्यन्त चहाचा कप घेवुन येत नाही तोपर्यंत पुढची चर्चा होतचं नाही...तसचं आपल्याकडे एखादे वेळी पाहुण्याला जेवण नाही विचारल तरी चालेल पण चहा विचारलाचं पाहिजे असा अलिखित नियम आहे म्हनुनच की काय चहां आपला राष्ट्रीय पेय म्हणून घोषित झालाय.

काहीजन म्हणतात चहा शरीराला चांगला नाही बुवा..असेल ही . पण आमच बुवा चहाशिवाय पान ही हालत नाही...अगदी कधीही चहा प्यायला सांगितल तरी आम्ही तय्यार... अगदी झोपेतून उठवलं तरी चालेल. काय म्हणता तुमचं ही असचं आहे का माझ्यासारखं ? तर मग ह्याच गोष्टी साठी होवून जावुद्या आणखी एक कप चहा?

-प्रफ़ुल्ल शेंड्गे

हेवा

                 


                     "नशीब चांगल आहे यार त्याच , मस्त नोकरी आहे त्याला ,  पगार ही गलेगठ्ठ, मला ही असा पगार मिळायला पाहिजे  , गाडी बघितली का त्याची, नाहीतर माझी "खटारा" , घर पण मस्तच आहे ..नाही तर मि राहतोय आज ही खुराड्यात  " .....काय विचारताय   कोण बोलतय हे सार आणि कुणाबद्दल ? अहो , तुम्हीच बोलताय कि , तुम्ही म्हणजे अगदी तुम्ही नाही आपण सारेच ह्या पंगतीत येतो ... आपण किती दु:खी आणि आपल्याकडे काय-काय नाही आणि दुसर्याकडे किती सुख आहे ह्याची बाराखडी आपण रोजच गात असतो .देवाने- नियतीने  सारी दु:ख , हाल अपेष्टा आपल्याच पदरात टाकल्या सारखी आपली ओरड चालू असते ...माझ्या कडे 'हे' असल असत तर ... अस झाल असत ...आणि 'ते' असल असत तर मी ही 'तस' करून दाखवलं असत... आपल्यालाला ना दुसर्यांचा हेवा करायची सवय लागलीय , आपल्याला कितीही आणि काहींही मिळाल तरी आपण मात्र समाधानी काही होत नाही कारण आपल्याला जे मिळालय त्यापेक्षा दोन थेंब का होईना दुसर्याकडे जास्त असतचं आणि  आपण फ़्क़्त त्याचाच विचार करत राहतो पण आपल्या पेक्षा दोन थेंब कमी मिळालेल्या कडे आपण साफ दुर्लक्ष करत असतो , आपल्याला कुणापेक्षा तरी जास्त मिळालय  ह्याचा विचार आणि जे काही मिळालंय त्यात सुख मानन सोडूनच दिलय आपण . ५ हजाराच्या ही नोकरीतही  जे भागत होत ते आज २०-३० हाजाराच्या नोकर्या करूनही पूर्ण होत नाही , आपल त्यात भागत नाही . ह्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या वाढत चालेल्या गरजा आणि हाव .  2 चाकी गाडी आली कि वेध लागतात 4 चाकीचे , 1BHK रूम असली तरी कुणाकडे तरी आपण 2BHK रूम पाहतो आणि आपल्या ही मनात मोठ्या घराची हाव वाढायला लागते ..अशा अजून कित्येक सार्या गोष्टी आहेत माणसागणिक त्या बदलत जातात इतकचं .
कधी कधी वाटत माणसाला स्वताला  काय मिळाल नाही ह्याच दु:ख मुळात नसतच कधी , पण जे आपल्याला हव असत ते दुसर्या कुणाला तरी मिळालय ह्याचा विचारच त्याला जास्त त्रास देत असतो .

                              आता तुम्ही म्हणत असाल ...असा विचार करणं काय चुकीच आहे का ? मोठी स्वप्न बघन पाप आहे का ? आम्ही आमची प्रगती करू नये का ? नाही..नाही माझ तस अजिबात म्हणन नाही . स्वप्न बघन , विचार करण हा आपला अधिकारच आहे .पण फ़्क़्त विचार करून , दुसर्याचा हेवा , इर्षा करून आपली प्रगती थोडीच का होणार आहे ?, आपल्याला जे समोरच्याकडे  दिसतंय ते मिळवण्यासाठी समोरच्याने किती मेहनत , कष्ट केली असतील ह्याचा आपण कधी विचार करतो का ? नाही ना ? आपण तेवढ कष्ट करायला तयार आहोत  का ? ह्याचा कधी विचार केलाय का ? अहो ,नविन काही मिळवण्यात काहीच गैर नाही पण जे आपल्याकडे कडे आहे ते ही कित्येकाकडे नाही ते ही विसरून कस चालेल , म्हणून म्हणतोय आपल्याकडे आहे त्यात समाधान मानून जगल तर आपल्यासारखेच सुखी बहुतेक आपणच होवू... म्हणून काही नविन मिळवण्याची धडपड मात्र सोडू नका..प्रामाणिक प्रयत्न करा ,कष्ट करा..तुम्हाल जे हवं आहे ते सारं मिळेल फ़्क़्त मनात जिद्द आणि संयम तेवढा ठेवा .

-प्रफुल्ल शेंडगे .

सिनेमा

काय रे ह्या आठवड्यात कोणता पिक्चर आलाय? अमुक हीरोचा ,तमुक हिरोईन चा सिनेमा कधी येणार आहे? काय मस्त होता ना सिनेमा, काय अभिनय केलाय, एक नंबर कथा होती....असे संवाद नेहमीचे झालेत. काही वर्षांपूर्वी सिनेमाला भारतात सुरुवात झाली आणि म्हणता म्हणता सिनेमानि आपल्या मनावर गारुड घातल...पौराणिक,घरगुती,रोमांटिक, हौरर अश्या अनेक साच्यातले सिनेमा बनत राहिले किंबहुना आज हि बनतायेत , काही वर्षां पासून सामजिक प्रश्नांवर भाष्य करणारे, आपल्या आजुबाजुला घड्नारे प्रसंग ,गोष्टीचा सिनेमाच्या कथेत प्रवेश झालाय. सिनेमातली कथा, त्यात दाखवले जाणारे प्रसंग आपल्याला आपल्याच जगण्याचे भाग वाटायला लागले...कधी कधी आपलही आयुष्य असच फ़िल्मी असाव ....सगळ चांगल व्हाह, सिनेमातल्या हीरो-हिरोइन सारख आपल आयुष्य असाव अस वाटायला लागल ...मग त्यांच्या दिसन्याची,वागण्याची कॉपी करन सुरु झाल...अगदी हेअरस्टाइल पासून ड्रेसिंग स्टाइल पर्यन्त सगळ कॉपी ...
सलमान सारखी बॉडी, रणवीर सारखा लुक , करीना सारखी झिरो फिगर ,शाहरुख सारखा रोमांटिक पणा, अस एक ना एक सुरु असतच नेहमी आपल.पण आजकल आपन फक्त सिनेमालाच आपल आयुष्य आणि जग मानत चाललो आहे...जगात घडणार्या गोष्टीना आम्ही फक्त सिनेमातच पाहतोय आणि जगतोय...आता पाहा ना सैराट सारखा सिनेमा येतो तेव्हा आम्हाला औनर किलिंग बद्दल ची दाहकता कळालि, तिहि फक्त त्या सिनेमा पुरती मर्यादित...सिनेमातल्या हीरो-हिरोइन ची अवस्था पाहून अनेकांच्या डोळ्याना पाण्याची धार लागली, अनेकांची मन अस्वस्थ झाली होती, न्यूज़, फेसबुक सारख्या सोशल मीडिया वर आपन किती अस्वस्थ झालो होतो ते आपण सार्यानिच पोस्ट केलि असेल...पण हेच जर आपल्या आजूबाजुला खरखुर घडल तर आपन सरळ सरळ डोळेझांक करतो...फँड्री सारखा सिनेमा जातिव्यवस्था दाखवतो,उड़ता पंजाब सारखा तरुनायित वाढत चाललेल्या व्यसनावर प्रकाश टाकतो, मिल्खा सिंग, मेरी कोम,पानासिंग तोमर सारखे खेळाडु आपल्याला माहिती ही नव्हते ते ही आपल्याला सिनेमानीच दाखवले ...नट सम्राट, बाग़बाण सारखा सिनेमा येतो तेव्हा आई वडिलांच दुःख समजत ,स्लम डॉग मिलेनिअर सारखा सिनेमा झोपड़पट्टीत राह्नार्यांची अवस्था दाखवतो आणि आपन वर वरची हळ्हळ व्यक्त करतो पण समोर एखादा भुकेला जिव आला तर आम्ही नजरा फिरवून घेतो.का करतो आपन अस? कारण आपन ह्या सार्या विषयाना फक्त सिनेमा पुरत त्या अडिज-तिन तासांपुरता मर्यादित ठेवलय..
...हो ना?  सिनेमा चालु आसेपर्यन्त किंवा पुढचे काही तास, दिवस आमच्यात जोश येतो आणि त्यानंतर मात्र आपन सार विसरून जातोय, पुन्हा आपण थंडगार....वाट पाहत राहतो नव्या आठवड्याची ....सोबत येणार्य नव्या सिनेमाची...

-प्रफ़ुल्ल शेंड्गे

पाउस






पाउस ...... आला बुवा एकदाचा पाउस ...गेले 4-5 महिने गरमिने आणि दुष्काळाने त्रासलेले आपण सारेच पावसासाठी आतुरलो होतो ... थोडासा उशीर झाला यायला पण "देर आये दुरुस्त आये " म्हणत सार्यांनीच वरुण राजाच  स्वागत केलय ...आता पुढचे 4 महिने बेदुंध होत तो कोसळत राहणार, डोंगर माथ्यावरून कोसळत , नदी नाले तुडूंब भरून वाहु लागतील , सार्या धर्तीवर हिरवा शालू पांघरला जायील.... . हो हो माहिती आहे ....तुम्हाला हे सार माहिती आहे ते , लहानपणी तुम्ही निम्बंधात हेच सार किंवा असच वर्णन केलय..हो ना ? मि सुद्धा असच लिहित होतो ...लहानपणीचा पाउस होताच तसा खरच विलोभनीय आणि मनाला आनंद देणारा  , पण आधीसारख आपण पावसाकड़े पाहतोय का? एन्जॉय करतोय का पाउस?...

पाउस आला कि होणारी कीच-कीच, तुंबणारे नाले , तुम्बणारी गटारी , रस्त्यावर साठणार पाणी असो किंवा रस्त्याच्या खड्ड्यात होणारी डबकी , रस्त्याच्या बाजूला पसरलेला कचरा , प्लास्टिक , रस्त्यावर पसरलेलं वाहनातल तेल , त्या सार्यातून दररोज च्या जगण्याची धडपड , पावसासोबत येणारा नेहमीचा ट्राफिक जाम असो किंवा रेल्वेची होणारी रखडगाडी , त्यामुळे होणारी गर्दी, गर्दीतले  ओले-ओले स्पर्श , ओल्या कपड्यांचा सुटणारा कुमट वास , अगदी जीव नकोसा करायला लागतो ...तरी नाक दाबून जगन चालू असत ...

आधी पाउस म्हटला कि कागदांची होडी बनवायची स्पर्धा आता स्वताला सिद्ध करायच्या स्पर्धेत हरवत चालली आहे , चहा-भजी आणि भाजलेली कणस आता  फ़्क़्त पोट भरण्यासाठी खाल्ली जातायेत , त्यातली मजा घ्यायला वेळ आहे कुठे ?  , पहिल्या पावसात भिजण  आता इतिहासजमा झालय , खिशातल पाकीट आणि मोबाईल पावसातल्या भिजण्याच्या आनंदापेक्षा महत्वाचा  झालाय....साध खिडकीतून येणार्या पावसाच्या थेंबा ना  ही आम्ही झटकन खिडकी बंद करून स्वता पासून दूर सारतोय...गेलोच जरी कधी पावसात फिरायला तरी आपण कुठे एन्जोय करतो मनमुराद , जातो ते फ़्क़्त  कॅमेरात स्वताचे फोटो कैद करण्यासाठी आणि ते फोटो आणि स्टेटस  सोशल मेडिया वर उपलोड करण्यासाठी इतकच  ...प्रोफेशनल जगण्याच्या नादात आम्ही स्वताच कुठ तरी आम्ही आमच मनातलं बालपण मारून टाकलय सोबत मारलाय तो लहानपणीचा हवाहवासा वाटणारा पाउस .

काय म्हणता ? तुमचीही अवस्था अशीच आहे माझ्यासारखी ?...मग काय कराव बर ? एक होवू शकत ...बघा जमतंय का ? आपण सर्वांनी  ह्या वर्षीचा पाउस पुन्हा लहानपणी सारखा जागून पाहूयात का ? दररोज नाही किमान एक दिवस तरी देता येयील ना  आपल्या या लाडक्या पावसाला ... ही पावसाची 4 महिने सरून गेली तर पुढची 8 महिने त्याला फ़्क़्त आठवण्यातच  काढावी लागतील आणि तेव्हा वाटत राहायला नको की पावसात भिजण राहून गेल म्हणून. सो लेट्स एन्जॉय .

-प्रफुल्ल शेंडगे


    

   

चारोळ्या... मनातल्या .

तनहा तनहा रातो में
अश्को का यूँ बहना ।
बरसती तेरी यादो में
मेरा बिन चाहे संभलना ।

जारी है आज भी,
दिल की तेरी गलियों में
मेरा खुदको ही तलाशना ।
प्यार भरी नजर के लिए तेरे
मेरा रोज का यूँ तरसना ।


****

तुझसे एक बार बात करनी थी
आखरी ही सही मुलाक़ात करनी थी
दे देता तुझे हर एक जवाब
बस एक बार तू सवाल तो पूछ लेती थी

****

आज सगळच कस शांत शांत...

तुझ्या डोळ्यातले शब्द
ओठातल गाण
गालातल हसण
आणि लाडातल बोलण

तुझ्या हातातल कंगन
छुमछुमणार पैंजन
तुझ्याशिवाय वाहणारा किनारा
आणि भुनभुननारा वारा

आज सगळच कस शांत शांत...

****


भावनेला शब्दांची तशी गरज नाही
पण सांगने ही तुला भाग आहे
तू वाचावे मनातल्या शब्दाना माझ्या
म्हनुनच कविता मी लिहित आहे

****

ठरवून तुझ्याशी खुप काही बोलायच असत
पण सार विसरून जातो
शब्दात असा अडकत जातो की
स्वतालाच तुझ्यात हरवून बसतो

****

माझे मन समुद्राच्या लाटा,
तू भासे मज एक किनारा.
अविरत तुलाच येवून भेटे,
मी सोडून समुद्र सारा.

****

चेहरा तुझा बोलत होता
डोळे माझे तुला वाचत होते
ह्या सारयात शांत फक्त
तुझ्या माझ्यातले मौन होते

साठवून ,दडवून मनात गुपित
तू जगात सार्या वावरत होतीस
बहुतेक दुनियेच्याच भीतीने,
सार्यांसमोर... तू माझ्यासोबत गप्प होतीस.

****

कधी कधी वाटत उगाच तुझ्याशी भेटलो
छान सरळ होत आयुष्य,का स्वताला अडकवून घेतल?

भेटलो जरी आपन , तरी का तुझ्या प्रेमात पडलो?
मुक्त माझ्या मनाला,का तुझ्यात गुंतवून ठेवल?

गप्प राहून प्रेम करण का मला उमगल नाही ?
नकार तुझा ऐकन्याची ,खरच इतकी होती का मला घाई?

होते नव्हते भाव-बंध सारे ,क्षणात निखळुन पडले
तरी आठवणीं शिवाय तुझ्या जगणे, मला आजही का नाही जमले?

****

तुझ्याशी तस मला खुप काही बोलायचय,
मनातल माझ्या ,सार काही सांगायचय,
पण ,"बोलून टाक ना रे,अजुन किती वाट पहायला लावशील",
ह्या तुझ्या एका वाक्यासाठी मला मुद्दाम गप्प रहायचय

****

प्रेम मिळ्त की मिळवाव लागत?
कुणी म्हनत कराव, कुणी म्हनत आपसुक होवून जात

कुणी म्हणत हां तर नशिबाचा खेळ
कुणासाठी हां मात्र दोन मनांचा मेळ

कुणी म्हणत प्रेमात भेटतात फक्त विरहाच्या आठवणी
कुणी गात प्रेमात आयुष्याच्या सुखांची गाणी

खरच प्रत्येकाच प्रेम इतक वेगवेगळ असत?
मग का हो म्हणतात "तुमच आमच प्रेम अगदी सेम असत" ?

****

ती नेहमी विचारायची,
लिहन्यात एवढ दुःख आनतोस कुठून?
मी हसून विषय सोडून द्यायचो,
बोलायचो मात्र काहीच नाही.
सांगू तरी तिला काय अणि कसं,
की ही तूच दिलेल्या घावांची बोचनी आहे,
दुसर दुःख तस माझ्याकडे काहीच नाही.

****

सगळच स्पष्ट कस ग सांगू तुला,
थोड तू ही माझ्या मनातल ओळ्खुन घे.
व्यक्त होवून तू तुझ्यातुन,
प्रेम शब्द माझ्यावरचे,एकदातरी सांगुन दे.

****

'तूच हवीस,तूच हवीस' असा सारखा दंगा माजवी,
पण "होशील की नाही माझी?",ह्या प्रश्नात मात्र अडकून जाई
आता तूच काय ते समजवाव माझ्या ह्या मनाला
कारण तुझ्याशिवाय तो आता कुणाचाच ऐकत नाही.

****

तीच ते नेहमीच माझ्याशी कोडयात बोलणं
त्या कोड्याच्या उत्तरात माझ तासन-तास झुलनं
कधी वाटायच तीही माझ्या प्रेमात आहे की काय?
पण परत विचारत लोटून द्यायच मला ,तीच ते अनोळखी वागण.

****

नव्या नव्या किरणात,रूप तुझ नहालेल,
पुष्पगुच्छात जस एक गुलाब बांधलेल.
ओठी पसरलेल्या तुझ्या हास्याची जादू ,काय ती वर्णावी
जणू सडा पसरविला होता,पुनवेच्या चांदण्यानी.

****

प्रेमात परत कुनाच्यातरी,पडायच मला नाही,
स्वप्नात कुठल्याही आता, फिरकायाच ही नाही,
तुटलेल काळीज माझ जोड्लय मी कसबस,
पण पुन्हा एकदा विरहाच दुःख झेलायची,
ताकद आता माझ्यात नाही

****

गुंतलो तुझ्यात तर त्रास होतो
अणि सुटलो तर सर्वत्र तुझाच भास् होतो.

****

वाटलच कधी प्रेमात पड़ाव अस तर एकदा माझ्याच प्रेमात पड
हात हातात देवून तुझा ,साथ आयुष्याची मागुन तरी बघ

गालातल हासू,डोळ्यातले आसू
करून स्वाधीन माझ्या , तुझ्या स्वप्नातल जग
मिठीत माझ्या एकदा सामावून तर बघ.

-प्रफुल्ल शेंड्गे