रात्रीची दुनिया

रात्र .... रात्र म्हटल ना माझ्या डोळ्यांवर लगेच झोप आलीच म्हणून समजा , भारी असत राव गुपचूप झोपून ,जगाला विसरून ,आपल्या स्वप्नात बुडून जायचा विचार ,काही तासांसाठी का होईना आज आणि उद्याचा दिवस, त्यातल रोजच टेन्शन विसरुन जायला... पण ह्या आठवड्यात माझ्या अशा ह्या विचारला ब्रेंक लागला होता.नाईट शिफ्ट होती ना माझी ऑफिस मध्ये .

नाईट शिफ्ट साठी ऑफिस मध्ये आलो , ऑफिस मध्ये येताना रस्तावर माणसांची बरीचशी वर्दळ होती , घरी परतण्याच्या ओढीने सर्वांची पाउले जरा जास्तच घाई घाईत पडत होती ,तर काही जन रस्त्यालगतच्या विविध खाण्याच्या गाड्यावर आपली भूक शमवत होते, मी मात्र आज प्रवाहाच्या दिशेच्या विरुध्द चालत होतो. ऑफिस मध्ये येवून मी माझ्या कामाला लागलो , जस जसा वेळ सरत होता , तस-तशी खिडकीच्या बाहेर असणारी दुनिया शांत व्हायला लागली होती ,गाड्याचा आवाज , रस्त्यावरून फिरणाऱ्या माणसांची गर्दी , लोकलची धडधड सार शांत शांत होत चालल होत ,आवाज येत होता तो फ़्क़्त ऑफिस मधल्या फिरणाऱ्या पंख्यांचा ,घडाळ्यातल्या टिकटिकिचा ,मधूनच भुंकणाऱ्या कुत्र्याचा आणि माझ्या किबोर्ड वर होणार्या टाइपिंगचा .

रात्र जशी डोक्यावर यायला लागली तशा माझ्या डोळ्यांच्या पापण्या जड व्हायला लागल्या होत्या म्हणून माझ्या कामातून एक छोटासा ब्रेंक घेवून मी खिडकीतून बाहेर बघायला लागलो ,रोज घोड्यासारख धावणार शहर काहीस संथ झाल होत , दिवसभर धावपळ करणारी लोकल ट्रेन कारशेड मध्ये डुलकी घेत आराम करताना दिसत होती ,रस्त्याचे सिग्नल, पिवळे दिवे पेटवत एकटेच उभे होते त्यामुळे हायवे वरून धावणाऱ्या गाड्या अगदी सुसाट धावत होत्या, रस्त्याच्या बाजूला लावलेले दिवे , इमारती वरचे दिवे चमचम करत होते , जणू दिव्यांची माळ पेटत आहे का असा अनुभव येत होता त्या पेटलेल्या दिव्यांकडे पाहताना ,समोरच्या एका ऑफिस मधल्या एका माळ्यावरचे सुद्धा लाईट पेटलेले होते ,बहुतेक तिथ हि कुणीतरी माझ्यार्ख जाग असाव . हळूच वर आकाशात नजर फिरवली , चांदण्यांनी आकाश भरून गेल होत. त्या चांदण्यांच्या मधून स्वताचा प्रकाश घेवून लुकलुकत एखाद विमान उडताना दिसत होत , चंद्राच्या प्रकाशात काही ढगांची हालचाल जाणवत होती , चोरपावलांनी , चंद्राला स्वत खाली झाकून ते ढग त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघत होते . ऑफिस च्या सहाव्या मजल्यावरून रात्रीच्या प्रहरी जगाला शांत झोपलेलं मी पाहत होतो , तरी मनात एक विचार होता , खरच , हि रात्र जितकी शांत वाटतेय ती खरच सगळ्यांसाठी इतकी शांत असेल का ? रात्रीच्या झोपेत फ़्क़्त स्वप्न न पाहता रात्रीच्या या मंद प्रकाशात रात्रीचा दिवस करून स्वताची पाउलवाट शोधणारे , जगण्यासाठी धडपडणारे असतीलच कि , कोणीतरी-कुठेतरी-कुणाच्यातरी काळजीने , ओढीने जाग असेल ना ... असेल कुणीतरी आपल्यासारख रात्री जागून पुन्हा दुपारी झोपुन स्वप्न पाहणार.

रात्रीला म्हणा किंवा अंधाराला आपण सारेच थोडेसे घाबरून असतो , अंधार आपल्याला नकोसा वाटत असतो पण ह्या रात्रीच्या अंधाराची आणि त्यातल्या जिवंतपणाची वेगळीच मजा असते . डोक्यात हे सारे विचार करत मी एकटक खिडकीच्या बाहेर पाहत होतो ,रात्रीच ते वेगळ विलोभनीय दृश्य न्याहाळत .शांत राहूनही ती रात्र माझ्याशी खूप काही बोलू पाहत होती ,मलाही तिच्याकडून खूप काही ऐकायच होत पण हवेत पोकळी निर्माण व्हावी आणि सारे शब्द विरून जावेत अस काहीस झाल होत त्या वेळी .माझ्या मनातल्या विचारांची मालिका चालूच होती तोच कारशेड मधल्या लोकल ने होर्न दिला , त्या आवाजाने मी माझ्या विचारातून बाहेर येवून घडाळ्याकडे पाहिलं , पहाट झाली होती , दिवसाची पहिली लोकल तिच्या कामाला निघायला तयार होती..मग मी हि माझा हा दहा मिनिटांचा ब्रेंक संपवून पुन्हा माझ्या कामाला लागलो. सोबत एक प्रश्न डोक्यात घेवून तो म्हणजे "स्वताला आणि स्वतासाठी जगायला लावणारा दिवसाचा गोंधळ चांगला कि रात्रीचा , तुम्हाला स्वतासोबत जगाचाही विचार करायला हा शांतपणा चांगला ?"

-प्रफुल्ल शेंडगे .

No comments:

Post a Comment

कृपया तुमच्या प्रतिक्रिया इथे लिहा .... Please give your valuable Comment:-